गाणं ह्रदयातलं

नमस्कार 🙏 "गाणं ह्रदयातलं"  या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत! आठ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा ८८ वा वाढदिवस साजरा झाला. आशा भोसले यांच्या आवाजातील जादूने ज्या गाण्यानं मराठी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं असं अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे *कविवर्य म पां भावे* यांनी लिहिलेलं गाणं ज्याचे शब्द आहेत - 

 *स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा* 
 *गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा* 

या गाण्यामुळे म पां भावे हे नाव महाराष्ट्रात घराघरात पोचलं. भावे एकदा कामावरून घरी येत असताना त्यांच्या पुढे चालत असलेल्या  दोन मुलींचा संवाद त्यांच्या कानावर पडला. थोडक्यात सांगायचं तर एक मुलगी दुसरीला सांगत होती कि अपूर्ण स्वप्न साकार होईपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी आपण एकरूपतेने झटत असतो. पण एकदा का ते स्वप्न पूर्ण झालं कि मग सगळी गंमतच निघून जाते. हा संवाद ऐकून म पां भाव्यांना "गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा" ही दुसरी ओळ अगोदर सुचली आणि नंतर हे गाणं लिहून पूर्ण झालं. 

 *रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या* 
 *साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या* 
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा

आपल्या आयुष्यात बरेच वेळा असंच घडतं कि आपण सुखाची छान छान स्वप्नं पहायला लागलो कि मनातल्या असंख्य शंकाकुशंकांच्या वादळात ती स्वप्नं विरून जातात पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून ती आपल्याला खुणावत असतात. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच कधी दु:खाच्या झळांनी उबग येते तर कधी सौख्याच्या चांदण्यात ही अपुरी राहिलेली स्वप्नं खुणावत रहातात आणि ती चिकाटीने पूर्ण करण्याची जिद्द पुन्हा एकदा मनाला उभारी देते.

 *नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी* 
 *विरहात चिंब भिजूनी प्रिती फुलोनी यावी* 
 *काट्याविना न हाती केंव्हा गुलाब यावा* 

कधीकधी मनावर नैराश्याचे इतके काळे काळे ढग दाटून येतात कि त्याखाली आशेचा सूर्य पूर्णपणे बुडून जातो पण ब-याच विरह कालावधी नंतर प्रियकराची भेट व्हावी आणि मन उचंबळून यावं, तशाच मनातल्या आशा पुन्हा पल्लवित होतात, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली स्वप्नं पूर्णत्वाच्या दिशेने पुन्हा झेप घेतात. असं करताना अडचणींचे, नैराश्याचे काटे जरी रक्तबंबाळ करून गेले तरी त्याशिवाय स्वप्नपूर्तीच्या गुलाबाचं मोल किती अनमोल आहे हे कळत नाही. 

 *सिध्दीस कार्य जाता येते सुखास जडता* 
 *जडतेत चेतनेला उरतो न कोणी त्राता* 
 *अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा* 

एखादी ईच्छा पूर्ण झाल्यावर जीव सुखावतो मात्र कालांतराने त्या सुखाचंही मनाला, जीवाला जडत्व येतं. जीवाला जडत्व आलं कि शरीरातल्या चेतनेलाही जडत्व येत जातं अशा वेळेस माणसाच्या राहिलेल्या सर्व ईच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जन्म-मरण-पुनर्जन्म या चक्रात पुन्हा हा जीव गुरफटत जातो..... राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी!!!

गाण्याच्या सुरुवातीला वाजणारा अनिल मोहिले यांचा व्हायोलिनचा सूर, त्यानंतर आशा भोसले यांचा सुरेल स्वर आणि गाणं संपताना आशाताईंनी "केंव्हा " या शब्दावर घेतलेली फिरत ऐकल्यानंतर हे गाणं आपल्या ह्रदयात स्थान मिळवतं.


🙂 विकास मधुसूदन भावे

१२ सप्टेंबर २०२१